मुंबई वृत्तसंस्था
उद्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात भाजपचे सर्वाधिक म्हणजे २२ मंत्री असतील, तर शिवसेनेचे १२ मंत्री असणार आहेत. भाजपच्या गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांना, तर शिवसेनेच्या संजय राठोड, तानाजी सावंत व दीपक केसरकर यांना मंत्रिपदाऐवजी संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांच्या जबाबदारीमध्ये पक्षवाढीसाठी बदल करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. यापैकी गिरीश महाजन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यावा यासाठी राज्यातील भाजपचे नेतृत्व दिल्लीतील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नवीन मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. गृह खाते हे भाजपकडेच राहणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच ते कायम राहणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास याबरोबरच गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात येणार असून, उद्योग खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. भाजपने अर्थ खात्याचा आग्रह सोडला असून ते पूर्वीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच असेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे मदत व नियोजन, पुनर्वसन याबरोबरच उत्पादन शुल्क खात्याचीही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते.