ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्ञानराया निघाले विठ्ठल भेटीला : टाळ-मृदंगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

आळंदी : वृत्तसंस्था

जाय जाय तूपंढरी । होय होय वारकरी। वारकरी संप्रदायाचे प्रतीक तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भाविकांच्या हरिनाम गजरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे वैभवी प्रस्थान झाले. भक्तिमार्गाचे दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माऊली मंदिरातील वीणा मंडपातून शनिवारी (२९ जून) वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखी सोहळ्याने सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी वीणा मंडपातून प्रस्थान केले. आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळ्याची थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने अनेकांनी आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला.

सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा एक दिवसाच्या मुक्कामास हरिनाम गजरात रात्री विसावला आळंदीत या वर्षी पहिला एक मुक्काम घेत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे रविवारी (३० जून) मार्गस्थ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, संजय ऊर्फ बंडू जाधव, खा. श्रीरंग बारणे, सरकार ऊर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त अॅड, राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर आदी फडकरी, दिंडीकरी मानकरी उपस्थित होते.

प्रस्थान दिनी श्रींच्या पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी, यशोदीप जोशी, महेश जोशी, तुषार प्रसादे, योगेश चौधरी, प्रसाद जोशी, मंदार जोशी यांनी केले. प्रस्थान सोहळ्याचे नियोजन या वर्षी थेट शासनाच्या हस्तक्षेपात झाले. अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रींचे पालखी रथ ओढण्यासाठी या वर्षीची सेवा सहादु कुऱ्हाडे वस्ताद यांनी रुजू केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!