ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोवा विधानसभा निवड्णुक ; भाजपने प्रसिद्ध केली उमेदवारांची दुसरी यादी, सिद्धेश नाईक ,उत्पल पर्रीकर बंडखोरीचा मार्ग स्वीकारणार ?

पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. डिचोली मतदारसंघातून विद्यमान सभा पती व तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राजेश पाटणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कळंगुट मतदारसंघातून गेल्या चोवीस वर्षे कळंगुट पंचायतीचे पंच असलेले व तीन वेळा सरपंचपद भूषविलेले जोसेफ सिक्वेरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

जुने गोवेचे जिल्हा पंचायत सदस्य असलेले सिद्धेश नाईक हे कुंभारजुवे मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. सिद्धेश हा केंद्रात मंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांचा मुलगा आहे. दुसऱ्या यादीत सिद्धेश यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले असल्याचं कळतंय. त्यांनी ही उत्पल पर्रीकर यांच्या प्रमाणे बंडखोरीचा मार्ग स्वीकारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी म्हणजेच आज या बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस उरल्याने आजच सिद्धेशनाईक यांना आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. कुंभारजुवे मतदार संघातूनच भाजपचे कार्यकर्ते रोहन हरमलकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. या मतदार संघातून जेनिता मडकईकर यांना उमेदवारी मिळाल्याने हरमलकर यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आपण अपक्ष लढणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

सांताक्रुज मतदारसंघातून विद्यमान आमदार आंटोनियो उर्फ टोनी फर्नांडीस यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. कुंभारजुवे मतदारसंघातून विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी व जुने गोवे पंचायतीच्या सरपंच जेनिता पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कुठाळी मतदारसंघातून नारायण नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कुडतरी मतदारसंघातून अंथोनी बार्बोझा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने गोव्यातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्व उमेदवारांची नावे घोषित केली आहे. भाजपा गोव्यात पहिल्यांदाच सगळ्या जागांवर निवडणूक लढवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!