जळगाव : प्रतिनिधी
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीच्या लाटेत चांदीचे दर बुधवारी आणखी तेजीत गेले. चांदीत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ नोंदवत ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र ५०० रुपयांची घसरण झाली असून, ते एक लाख २३ हजार ८०० रुपये प्रति तोळा इतके झाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर १० नोव्हेंबरपासून पुन्हा भाववाढीची लाट दिसू लागली. फक्त दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची वाढ होऊन ११ नोव्हेंबर रोजी ते एक लाख २४ हजार ३०० रुपयांवर गेले होते. मात्र, मंगळवारी (१२ नोव्हेंबर) दर पुन्हा घसरले.
दरम्यान, चांदी मात्र सतत तेजीत आहे. १० व ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत चांदीच्या दरात सात हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर बुधवारी पुन्हा दोन हजार रुपयांची उसळी घेत चांदी एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यामुळे फक्त तीन दिवसांत चांदीत तब्बल ९,५०० रुपयांची वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी या कारणांमुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.