नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करीत असतात, याच भाविकांसाठी खुशखबर आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन शनिवारपासून दि.२९ जून सुरू झाले आहे. बालटाल आणि पहलगाम कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला जत्था पहाटे अमरनाथ गुहेकडे रवाना झाला आहे. एकूण 4,603 यात्रेकरू आज शिवलिंगाच्या दर्शनासाठी चढणार आहेत.
अनंतनागमधील पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्गे आणि गंदरबलमधील बालटाल मार्गाने २९ जून रोजी सुरू झालेली अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. 26 जूनपासून ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
शुक्रवारी (28 जून) 4,603 यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पमध्ये पोहोचले होते. जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प येथून सीआरपीएफच्या त्रिस्तरीय सुरक्षेत 231 वाहनांतून हा गट निघाला.जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. लेफ्टनंट गव्हर्नर यांनी यात्रेकरूंना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बाबा अमरनाथजींच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात शांती, सुख आणि समृद्धी नांदो.श्रीनगरला पोहोचल्यावर वरिष्ठ पोलिस आणि नागरी प्रशासन अधिकारी आणि स्थानिक लोकांनी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागातील नवयुग बोगद्यामध्ये ४,६०३ यात्रेकरूंचे स्वागत केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.