मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच भोवल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर आता मंत्री गोरे हे देखील अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनाही उघडे केले. मुंडे, गोरे, रावल, राठोड अशा टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यातले मुंडे गेले. इतरांनाही जावेच लागेल. पत्रकार तुषार खरात यांची अटक हा स्वातंत्र्य, लोकशाही मानणाऱ्या जनतेसाठी आघात आहे. तुषार खरात यांच्या मागे उभे राहावेच लागेल. रोहित पवार हे तुषार खरात यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यांचे अभिनंदन! पण इतरांचे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली.
सामना मधील अग्रलेख देखील वाचा….
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या ‘आकां’च्या कोठीवर नाचत आहे काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घाणेरड्या प्रकरणास वाचा फोडली. साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली. गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला, असे ती महिला म्हणते. ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली व खटला मागे घेण्याची विनवणी केली. यापुढे पुन्हा त्रास देणार नाही, असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला. याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही.
गोरे यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे
कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटले नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणात निर्दोष सुटल्याचे खोटेच सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली व त्याबद्दल गोरे यांच्यावरच हक्कभंगाचा खटला चालवायला हवा. पुन्हा या पीडित महिलेची मुलाखत तुषार खरात यांनी घेतली व गोरे यांचा खोटेपणा उघडा केला. ही महिला 17 मार्चला राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. कारण गोरे यांनी त्या महिलेचा छळ चालूच ठेवला. गोरे यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे असे हे प्रकरण आहे, पण महाराष्ट्रात उलटेच घडले. गोरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून खरात यांच्यावर खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी असे गुन्हे लावले व त्यांना अटक करायला भाग पाडले. गोरे यांच्या सरकार पुरस्कृत झुंडशाहीस मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता आहे काय? पोलिसांचा हा असा मुक्त गैरवापर महाराष्ट्रात जागोजाग सुरू आहे व ते लोण आता स्वातंत्र्यलढ्यात पुढे असलेल्या छत्रपतींच्या साताऱ्यात पोहोचले.