ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय : मनोज जरांगे पाटील

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरले आहे तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. सरकार या प्रकरणी उगीच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आपण आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. ते 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जालन्याच्या आंतरवाली सराटीतून निघतील. त्यानंतर मजल दरमजल करत ते मुंबईला धडक देतील. त्यांच्या या आंदोलनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागल्याच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांत मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा निघाल्याचा दावा केला. पण मनोज जरांगे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना या बातम्यांत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा – फिडगा निघाला नाही. या प्रकरणी सगेसोयरेच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या प्रकरणी सरकारकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. सरकारने मुंबई दौऱ्यात विघ्न निर्माण करण्यासाठी आमच्याविरोधात ट्रॅप रचण्यात षडयंत्र रचले आहे. यासाठी मराठा समाजातीलच काही असंतुष्ट नेत्यांची मदत घेतली जात आहे. त्यांना सरकारची फूस आहे. पण आम्ही त्यांचा हा कट उधळवून लावू, असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!