पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात महाविकास आघाडीला यश आले होते. महाविकास आघाडीच्या केवळ खोटारडेपणामुळे लोकसभा निवडणुकीत अपयश आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणार आहे. महायुतीमधील तीनही पक्षांना विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांचा सर्व्हे करण्याचा अधिकार आहे. केंद्राचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे सरकार राज्यात असणे गरजेचे असल्याने या वेळी ‘अबकी बार महायुतीचे सरकार’ हा नारा असणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात केली आहे. त्याचबरोबर रविवारी पुण्यात पार पडणारे पक्षाचे अधिवेशन हे विजयाची नांदी असणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
२००७ नंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन हे पुण्यात बालेवाडी या ठिकाणी पार पडणार आहे. या अधिवेशनाची माहिती प्रदेशाध्यक्षांनी पुण्यात दिली. यावेळी महायुतीचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल काविडकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, पुण्यातील या अधिवेशनाला केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन केले जाणार आहे. तर, या अधिवेशनासाठी अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षाची मते महायुतीमध्ये परिवर्तन करण्यातही अपयश आले आहे. मात्र, यासाठी आणखी थोडा कालावधी हा द्यावा लागणार आहे. हा कालावधी गेल्यानंतर त्यांचीही मते आमच्या आणि आमची मते राष्ट्रवादीत परिवर्तित होणार आहेत. याचबरोबर महायुतीमधील मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना असणार आहे.