मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. आज दुपारी या आमदारांचा शपथविधी होणार आहे.
भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लावली आहे.
महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत, असा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यामुळे आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महायुतीच्या वतीने 7 जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांची लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आली. लोकसभेच्या सर्वेक्षणात पाटील यांना उमेदवारी दिल्यास हिंगोलीच्या जागेवर महायुतीचा पराभव होणार असल्याचे सांगत त्यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यानंतर त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशीम –यवतमाळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र त्या ठिकाणीही महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे. माजी खासदार पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली महायुती सरकारकडून केल्या जात होत्या. त्यानंतर आज शासनाने माजी खासदार पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष पदावर असे पर्यंत त्यांचा मंत्री पदाचा दर्जा राहणार आहे.