पुणे : वृत्तसंस्था
मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना गोविंदा उमेदवाराचे नावच विसरला. त्यावेळी भाजपच्या विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी गोविंदाला बारणेंच्या नावाची आठवण करून दिली. परंतु गोविंदा उमेदवाराचे नाव विसरल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गोविंदा उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे घेऊ लागला. या दरम्यान त्याने सर्वांची नावे घेतली मात्र उमेदवाराचे नाव घ्यायलाच विसरला. तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या भाजप आमदार उमा खापरे यांनी हळूच गोविंदाला बारणेंच्या नावाची आठवण करुन दिली. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्याला मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून गोविंदा उमेदवारांचा प्रचार करत आहे. खासदारकीचा अनुभव असलेल्या गोविंदाला प्रचाराची सवय असणे अपेक्षित होते. परंतु स्टार प्रचारकाला ज्याच्या प्रचारासाठी गेलोय, त्या उमेदवाराचेच नाव आठवत नसेल, तर बाकी काही गोष्टी कशा माहिती असणार, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. गोविंदाच्या हस्ते श्रीरंग बारणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. मात्र तरी देखील अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे