अक्कलकोट, दि.११ : गेल्या काहीं महिन्यांपासून अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी तलावाची दुरवस्था झाली असून याकडे पाटबंधारे विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे. या तलावाची प्रचंड दुरावस्था झाल्याने गावाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. चिककेहळळी तलावाच्या धर्तीवर याची दुरुस्ती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
साधारण १९७७ साली बांधलेल्या या तलावाची प्रचंड दुरावस्था झाली असून सांडव्याला भेगा पडले आहेत त्यामुळे गळती मोठ्या प्रमाणात होत आहे.या साठवण तलावाची क्षमता ११६ दशलक्ष घनफुट असली तरी केवळ ४० टक्के पाणी यात राहत आहे. ६० टक्के पाणी हे कर्नाटकात वाहून जात आहे. त्याचे लाभक्षेत्र हे साडेचारशे हेक्टर असताना आता केवळ ते १०० ते २०० हेक्टरवर पोचले आहे. तसे पाहिले तर या तलावाचा अप्रत्यक्ष फायदा ८०० हेक्टर जमिनीला होतो पण या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने या भागातील बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे.
मागच्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपात झाडे- झुडपे काढली आहेत.परंतु नंतर यावर्षी ती पुन्हा वाढल्याने या तलावाला कधी धोका निर्माण होईल, हे सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .तलाव वरच्या बाजूला आणि गाव खाली असे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाही याचा धोका आहे.पूर्वी या तलावाचा फायदा आजूबाजूतील आठ ते गावांना दहा गावांना होत असे. यावर अक्कलकोट शहर देखील अवलंबून होते. आज घडीला त्या ठिकाणची पाणीपुरवठा योजना देखील दुरुस्ती अभावी बंद आहे त्यामुळे या तलावाकडे आणखीन दुर्लक्ष होत आहे.
सध्या कुरनूर धरण शहरासाठी एकच पर्याय आहे पण या तलावाची दुरुस्ती झाली तर हा एक पर्याय शहरासाठी असू शकतो आणि संभाव्य पाणीटंचाई या तलावा द्वारे कमी होऊ शकते म्हणून सरकारने या तलावाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. मध्यंतरी तालुक्यातील चिक्केहळळी तलावाची अशाच पद्धतीने दुरावस्था झाली होती त्याला आता शासनाने निधी मंजूर केला आहे त्याच धर्तीवर हालचिंचोळी तलाव देखील नव्याने पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. सध्या तो जलसंपदा विभागाकडेच आहे तो जलसंधारण विभागाला हस्तांतरण करून या तलावाची नव्याने पुनर्बांधणी करून कर्नाटकात वाया जाणारे पाणी महाराष्ट्रात थांबवुन परिसरातील गावांचे सरकारने सुजलाम-सुफलाम करावे, अशी मागणी ग्रामस्थातून होऊ लागली आहे.
विशेष बाब म्हणून निधी द्यावा
महाराष्ट्र सरकारने या तलावाला विशेष बाब म्हणून तातडीने निधी मंजूर करावा. जेणे करून आजूबाजूच्या गावातील शेतजमिनीला पूर्वी सारखा फायदा होईल आणि अक्कलकोट शहराला पण पुन्हा पाणीपुरवठा सुरू होईल – सोमनिंग कांबळे, हालचिंचोळी ग्रामस्थ