ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहितला उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही : उपमुख्यमंत्री पवार !

मुंबई : वृत्तसंस्था

स्वायत्त संस्था या स्वतंत्रपणे काम करत असतात. माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली; परंतु त्यातून समोर काहीच आले नाही. रोहितवर झालेल्या कारवाईवरून त्याने मांडलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार मोशी येथे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामती अॅग्रो कंपनीवरील ईडीच्या छाप्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी दिल्लीला कोण गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून विचारले असता अजित पवार म्हणाले, कोण, कधी आणि कुठे गेला होता, याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या 1 स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेले नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही. नुकतीच राज ठाकरे यांनी हे सहकार चळवळीचे नाही, तर सहारा चळवळीचे सरकार असल्याची टीका केली. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी किती सहकारी संस्था उभारल्या, हे सांगावे. मी आतापर्यंत ३२ वर्षांत सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करतोय. सहकारी बँकांमध्ये थोडीशी जरी चूक झाली, तरी बँका रसातळाला जातात. त्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे नुकसान होते. त्यामुळे सहकार चळवळ चालवणे इतके सोपे नाही. राज ठाकरे काहीही बोलतील, अशी टीकाही पवारांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!