गडचिरोली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे कुटुंबातच कलगीतुरा रंगला आहे. मुलगी आणि जावयास नदीत बुडवून टाका, अशा शब्दांत मंत्री आत्राम यांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाग्यश्री आत्राम यांना इशारा दिला आहे. घर फोडण्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाषणात मत व्यक्त केले.
वडिलांचे मुलीवर प्रेम असते. वडीलच तिला घडवतो. परंतु वस्ताद आपल्या शिष्याला सर्व डाव सांगत नाही. तो एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे ती वेळ येऊ देऊ नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना इशारा दिला. आलापल्ली येथील जनसन्मान यात्रेत ते बोलत होते.
आयुष्यभर पक्ष फोडण्याचे काम केल्यानंतर शरद पवारांचा पक्ष माझे घर फोडायला लागला आहे, असा आरोप मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आलापल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आयोजित जनसन्मान यात्रेत आत्राम यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. माझी मुलगी माझी होऊ शकली नाही, ती दुसर्यांची कशी होऊ शकेल, असा सवाल करत आत्राम यांनी मुलगी आणि जावयास नदीत बुडवून टाका, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.