मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
रविवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक धुळे आणि नंदुबार जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.