सांगली : वृत्तसंस्था
हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लखन या जोडीने सांगलीत आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत विजेतेपद पटकावले असून, या विजयानंतर त्यांनी थेट फॉर्च्युनर कार जिंकली आहे. या जोडीच्या विजयाचा गौरव मुंबईत मंगळवारी (ता.११) होणार असून, परितोषिक वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे.
ही स्पर्धा सांगलीतील बोरगाव येथील श्रीनाथ केसरी मैदानावर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या वतीने रविवारी (ता.९) आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल ५०० पेक्षा अधिक बैलजोड्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
दांडेगावचे साईनाथ कऱ्हाळे व करण कऱ्हाळे यांच्या सर्जाची जोडी सर्जेराव पाटील चव्हाण आणि मनोहर पाटील चव्हाण यांच्या लखनसोबत झाली होती. या जोडीने तीन फेरी गटात प्रथम क्रमांक पटकावून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतही जबरदस्त कामगिरी करत विजेतेपदावर आपला ठसा उमटवला.
साईनाथ कऱ्हाळे यांनी सांगितले की, सर्जाला एक वर्षापूर्वी ४.५० लाख रुपयांत खरेदी करण्यात आले होते. त्याला दररोज १० लिटर दूध, बदाम आणि काजूंचा पौष्टिक आहार दिला जातो. गेल्या वर्षभरात सर्जाने हिंगोली, परभणी, नांदेड आणि वाशीम जिल्ह्यांतील शंकरपट व बैलगाडा शर्यतींमध्ये ४० हून अधिक पारितोषिके पटकावली आहेत.
या थरारक स्पर्धेत सर्जा-लखन जोडीच्या वेगवान कामगिरीने प्रेक्षकांनी जल्लोषात टाळ्यांचा कडकडाट केला. ग्रामस्थ आणि चाहत्यांकडून या जोडीचे भरभरून अभिनंदन करण्यात येत आहे.