ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांचे वेध; अक्कलकोट तालुक्यातील चित्र

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.२२ : सध्या तालुक्यात सर्वत्र थंडी असल्याने ज्वारी पिकाची वाढ जोमाने होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता हुरडा पार्ट्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने नियोजन आणि आराखडे बनू लागले आहेत. ज्या ठिकाणी पाणी भरपूर आहे. त्याठिकाणी सध्या हुरडा आला आहे. तर अक्कलकोट तालुक्यातील सत्तर टक्के भागात जानेवारीच्या अंतिम टप्प्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

सहसा शहरी भागातील लोक सुट्टीचा विचार करूनच हा बेत आखत आहेत. सुट्टीच्या दिवशी मस्त खेड्यात गुलाबी थंडीत उबदार कपड्यात ज्वारीचा गरमा गरम हुर्डा खाण्याची मजा ही काही औरच असते. त्यामुळे या मौसमाला मोठा अर्थ आहे. भरलेलं वांग, शेंगा चटणी, खोबऱ्याची चटणी, सोबत गुळाचा खडा, आणि गोवऱ्याच्या निखऱ्यावरून काढलेले कणीस चोळून तळहातावर राख फुंकत हुर्डा खाण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. फार झाले तर जानेवारी किंवा फेब्रुवारी हे दोन महिनेच या गोष्टीसाठी महत्वाचे आहेत.  या पार्ट्या एक महिन्यापर्यत चालतात. हा हुरड्याचा हंगाम जर निसटला तर थेट पुढच्या वर्षीच येणार. त्यामुळे एखादा शनिवार किंवा रविवार गाठून पाहुणे मंडळी हमखास याचे नियोजन करत आहेत.  सध्या त्यासाठीच्या पूर्व तयारीला वेग आला आहे.

कोरोनामुळे प्रमाण कमी

मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे हुरडा पार्ट्या होऊ शकल्या नाहीत. यावर्षी तशी शक्यता आहे पण अगदी किरकोळ स्वरूपात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हुरडा पार्ट्या होत आहेत. याचे आकर्षक मोठ्या प्रमाणात असते.दरवर्षी आम्ही आयोजन करत असतो.त्यामुळे सगळ्यांना याचे वेध लागले आहेत – एजाज मुतवल्ली, अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!