छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले असताना, औरंगाबाद खंडपीठात आज या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी होत आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख स्वतः न्यायालयात हजर राहिले असून, त्यांनी न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले, न्यायदेवतेवर आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. अनेक अडचणी, दबाव आणि भीतीचं वातावरण असतानाही आम्ही कायद्याच्या मार्गावर ठाम आहोत. संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.
या प्रकरणातील आरोपी समर्थकांकडून पसरवल्या जात असलेल्या अफवांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. आरोपी जामिनावर सुटणार असून त्यांची मिरवणूक काढली जाईल, अशा वल्गना केल्या जात आहेत. या अफवा केवळ कुटुंबीय आणि साक्षीदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा वक्तव्यांची योग्य ती दखल न्यायालय आणि संबंधित यंत्रणा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धनंजय देशमुख यांनी सांगितले की, आरोपी क्रमांक एकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर १२ डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती, मात्र ती अर्धवट राहिली होती. आज या सुनावणीचा उर्वरित भाग पूर्ण होणार असून, फिर्यादी आणि आरोपी पक्षाकडून युक्तिवाद मांडले जाणार आहेत. आम्हाला कोणताही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप नको, केवळ कायद्याच्या चौकटीत आणि पुराव्यांच्या आधारे न्याय हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तपास यंत्रणांवर आणि न्यायप्रक्रियेवर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, एसआयटी, तपास यंत्रणा, राज्याचे मुख्यमंत्री आणि न्यायालय — या सर्वांकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडली पाहिजे.
दरम्यान, आरोपींच्या समर्थनार्थ होत असलेल्या वक्तव्यांवर टीका करत धनंजय देशमुख म्हणाले की, कायदा किती कडक आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे. एका निष्पाप सरपंचाची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आज खंडपीठात वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी या प्रकरणात निर्णायक ठरण्याची शक्यता असून, या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.