---Advertisement---

राजकीय खळबळ; बावनकुळेंचा टोला : पृथ्वीराज चव्हाण झाले भविष्यवेत्ते!

By team
On: December 16, 2025 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात “सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल,” असा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. चव्हाण यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांचा थोडासा बुद्धिभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे. कधी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहतात, कोण जाणार, कोण येणार याचा अंदाज बांधतात. आता जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते पृथ्वीराज चव्हाणच झाले आहेत, असे मला वाटते,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती, हे आपण पाहिले आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि पीएमओमध्ये मंत्री होते, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले असतील तर यात काहीतरी काळेबेरं आहे,” असा उपहासात्मक टोमणा फडणवीस यांनी मारला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, अशा त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये, असा माझा सल्ला आहे.” पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. १९ डिसेंबरला नेमकं काय घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!