सांगोला : प्रतिनिधी
सांगोला शहरात पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ९ हजार ९७१ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पान टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. गुरुवारी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी शहरातील पान टपऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने युवराज गजानन झुरळे (रा. धनगर गल्ली), सिध्देश्वर पांडुरंग पांढरे (रा. सनगर गल्ली), योगेश महादेव मिसाळ (रा. धनगर गल्ली), अमोल सुभाष कमले (रा. सनगर गल्ली), सतीश प्रभाकर सासणे (रा. सनगर गल्ली) यांच्याकडून ९ हजार ९७१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचे पुरवठादार निशांत मिसाळ असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी सहा जणाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.