ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे. राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले आहे. यानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिल पासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विषयीच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यात गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीची बैठक नुकतीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथे पार पडली होती. या बैठकीत शिक्षणाच्या दर्जावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अंमलबजावणीतील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. धोरणाच्या प्रभावी कार्यवाहीसाठी शिक्षणतज्ज्ञ, प्रशासनिक अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी योगदान दिले आहे. ही बैठक राज्यातील शालेय शिक्षणाच्या समृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सकारात्मक दिशादर्शन करणारी ठरली असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group