नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यापासून मोठा हिंसाचार सुरु होता काही दिवसांनी हा हिंसाचार कमी झाला होता पण आता पुन्हा हिंसाचार भडकला आहे. कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो मारला गेलाय. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय. यामध्ये एका पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची माहिती मिळतेय. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित कुकी अतिरेक्यांनी एसबीआय मोरेह शहराजवळील सुरक्षा चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. डब्ल्यू सोमोरजीत असं मृताचे नाव आहे. तर आणखी एक कमांडो जखमी झाला आहे. वॉर्ड 7 जवळ दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा गोळीबार एक तासाहून अधिक काळ सुरू होता.
मोरेह येथील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. मणिपूर सरकारने शांततेचा भंग, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि तेंगनौपालच्या महसूल प्राधिकरण क्षेत्रात मानवी जीवन आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होण्याच्या भीतीने जिल्ह्यात संपूर्ण कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तू उपलब्ध राहणार आहेत. स्थानिक पोलिसांनी फिलिप खोंगसाई आणि हेमोखोलाल माटे यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसडीपीओ सीएच आनंद यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. या दोघांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर गोळीबार केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.