केज : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी राज्याचे राजकारण तापले असतांना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं आज दि.२५ फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलन सुरू झालं आहे. आंदोलनस्थळी नागरिक यायला सुरुवात झाली आहे. आंदोलनात संतोष देशमुख यांची आई शारदा देशमुख, मुलगी वैभवी, मुलगा विराज, भाऊ धनंजय देशमुख आणि त्याचे कुटुंब सहभागी झाले आहे.
माझ्या वडिलांना मारेकऱ्यांनी खूप छळ करून आणि हाल-हाल करून ठार मारले. त्यांना ज्या वेदना झाल्या असतील त्या आमच्या अन्नत्याग आंदोलनापेक्षा कैक पट जास्त होत्या असे भावनिक उदगार संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने काढले आहेत. आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांकडून आज अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर वैभवी हिने वडिलांच्या फोटोचे दर्शन घेतले. त्या नंतर तिने साश्रू नययाने कंठ दाटून आलेला असताना म्हटले की, माझ्या वडिलांना त्यांच्या मारेकऱ्यांनी हाल-हाल करून अत्यंत निर्दयीपणे वेदना देवून ठार मारले. त्यांच्या वेदनेपुढे आमच्या अन्नत्याग आंदोलनच्या वेदना खूप कमी आहेत. आमचा न्यायाचा लढा सुरू असून आरोपीला कठोर शासन व्हायला हवी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने तीने केली.
आंदोलन स्थळी केज तहसीलचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे. आंदोलन स्थळी आरोग्य अधिकारी आणि पोलीस उपस्थित आहेत. तसेच विविध वृत वाहिन्या आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असून दुपारी मनोज जरांगे हे उपस्थित राहणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आम्ही उघडे पडू देणार नाही. आम्ही त्यांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार अशी माहिती देत ह.भ.प. भागचंद महाराज झांजे हे देखील अन्न त्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.