पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील स्वारगेट बसस्थानाकातील अत्याचार प्रकरणातील आरोपीला काल मध्यरात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ट्रॅप करून अटक केली. मात्र हे घडण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल ज्यावेळी आरोपी मोकाट होता त्यावेळी राज्य सरकारमधील मंत्र्यांनी जी वक्तव्ये केली आहेत ती असंवेदनशील असल्याचे दिसून आले. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे आणि गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. दोन्ही मंत्र्यांच्या विधानावर सध्या विरोधकांकडून सडकून टीका होत आहे.
महायुती सरकारमधील वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी या घटनेबाबत असंवेदनशील वक्तव्य केले आहे. “पुणे येथील स्वारगेट प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत का नाही”?, असा प्रश्न संजय सावकारे यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले,असं म्हणता येत नाही एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर घटना घडत असतात, कारवाई सातत्यानं चालू राहते. महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत. फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही.सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत या दृष्टीनं कुठलंही शासन प्रयत्न करत असते. गुन्हेगार वृत्ती कुठेना कुठे प्रत्येक ठिकाणी असते, गुन्हेगार असल्यानं या गोष्टी घडत असतात, शासन कारवाई करण्याचं काम करत असते, असे धक्कादायक विधान संजय सावकारे यांनी दिले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काल त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, ” परवाच्या दिवशी जी घटना घडली, ती घटना कुठलिही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळं, तिथं ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तिथं दहा ते पंधरा लोकं बसच्या आजू बाजूला देखील उपस्थित होते. कुणालाही शंका आली नाही, त्यामुळं कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं, अन्य माहिती आरोपी ताब्यात येईल तेव्हा माहिती होईल”, असे खळबळजनक वक्तव्य केले होते.
दरम्यान , महायुतीतील मंत्र्यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल करत “सरकार दरबारच्या मंत्रिपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि असंवेदनशीलपणे व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातील या सगळ्या लेकी बाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील. न्याय मिळण्याऐवजी अशा प्रकारे प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावर शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतील तर न्याय मागण्याऐवजी लेकीबाळी जिवाचं बरं वाईट करणं पसंत करतील, योगेश कदम जरा बरे व्हा, “असे म्हटले आहे.