ग्रामपंचायतींना विना विलंब इंटरनेट सेवा त्वरित उपलब्ध करावी,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश,खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २१३ तर दुसऱ्या टप्प्यात ४८१ ग्रामपंचायतीचे काम अपूर्ण झाले आहे. १०२७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ४१ ग्रामपंचायतीमध्ये सुरळीत इंटरनेट सुरू आहे, ही गंभीर बाब आहे. उर्वरित ग्रामपंचायतींना विना विलंब त्वरित इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हा परिषदमध्ये भारत नेट/महा नेट यांच्या समस्येबाबत खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत श्री. स्वामी बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. शिंदे, बीएसएनएलचे उप महाव्यवस्थापक भास्कर सफर, उमेश शिंदे, आपले सरकार सेवा केंद्राचे महावीर काळे, महाआयटीचे रिजवान मुल्ला, फेज वनचे अनिल हुकुंडे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ महास्वामी यांनी सांगितले की, पहिला आणि दुसरा टप्पा असा कोणताही भेदभाव न करता सर्व ग्रामपंचायतींना सुरुवातीची पाच वर्षे मोफत इंटरनेट द्यावे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. येत्या एप्रिलपर्यंत कमीतकमी ८० टक्के ग्रामपंचायती इंटरनेटशी जोडणे अपेक्षित आहे, सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे त्वरित करावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या.
श्री स्वामी म्हणाले, काही ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित होत आहे. संबंधित यंत्रणेने कोणत्या विभागाची समस्या आहे, किती कामे प्रलंबित आहेत, याचा सविस्तर कृती आराखडा तयार करावा. प्रत्येक समस्येचे निराकरण केले जाईल.
२४ जानेवारीला महानेट मेळावा
केबल टाकण्यासाठी वन विभाग, महावितरण, रेल्वे, राजकीय, सार्वजनिक बांधकाम, रस्ते याबाबत समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी येत्या २४ जानेवारीला प्रत्येक पंचायत समितीमध्ये महानेट मेळावा घेतला जाणार आहे. यामध्ये सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.