नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आता जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या देशातील डोंगराळ राज्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हिमाचलमधील हंसामध्ये 2.5 सेमी बर्फवृष्टी झाली, तर काझासह इतर भागातही 5 ते 6 सेमी बर्फवृष्टी झाली. बुधवारीही येथे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कुकमसेरी येथे रात्रीचे तापमान -5.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, झोजिला पास यासारख्या उंच भागात बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा रोड, सेमथान-किश्तवार, मुगल रोड मंगळवारी बंद करण्यात आला. येथे बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. एमपी-यूपीसह 12 राज्यांमध्ये धुक्याचा इशारा आहे. उत्तर प्रदेशातील 40 जिल्ह्यांमध्ये दाट धुकेही दिसले आहे. दृश्यमानता 100 मीटरपर्यंत कमी झाली. थंड वाऱ्यामुळे येथेही थंडीचा प्रभाव कायम आहे. फतेहपूर हा राज्यातील सर्वात थंड जिल्हा होता. येथील तापमान ७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान खात्याने सांगितले की, मध्य प्रदेशात वाऱ्याची दिशा बदलल्याने दिवसा तापमानात वाढ होत असली तरी रात्री थंडीचा प्रभाव कायम आहे. भोपाळ, मंडला, पचमढ़ी, राजगढ, उमरिया, नौगाव सारख्या शहरांमध्ये, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळमध्ये तापमान 10 डिग्रीच्या खाली आहे. 2 दिवसांनंतर राज्यातील तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढेल.