पुणे : वृत्तसंस्था
महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवनिर्वाचित उमेदवारांना दिला आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यानी स्पष्ट शब्दांत नगरसेवकांनी कसे काम करावे याच्या सूचना दिल्या आहेत.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांचाही भावी नगरसेवक असा उल्लेख करीत फडणवीस यांनी त्यांचेही मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
“महापालिका हा आपला व्यवसाय, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे पक्ष ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याने उत्तमरित्या पार पाडावी. आपली प्रतिमा हे राजकारणातील सर्वात मोठे धन आहे. तुमची प्रतिमा ही भाजपची प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाऊ न देता सर्वांनी पुणे महापालिकेत काम करावे.” – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री