बीड : वृत्तसंस्था
राज्यात आज आषाढी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी विधीवतपणे पूजा करण्यात येत असतांना राज्याची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र संस्था नारायण गडावरती विठ्ठल रुक्मिणीची व नगद नारायण महाराजांची महापूजा पार पडली. पूजा संपन्न झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी व्हावा राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडावा व सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेवावे,असे विठ्ठलाकडे साकडे घातल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र नारायणगड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक याठिकाणी येतात.आषाढीवारी निमित्त लाखो भाविकांची गर्दी असते. जिल्ह्यासह जालना,औरंगाबाद ,पैठण सह विविध भागातून वारकऱ्यांसह भाविक न चुकता गडावर दर्शनासाठी हजेरी लावतात. नगदनारायण महाराजांवर भाविकांची खूप मोठी श्रद्धा येथे आहे. तसेच एकादशी निमित्त नित्यनेमा प्रमाणे विठ्ठलाची तसेच नगदनारायण महाराजांची महापुजा झाली यानंतर भजन, किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.