जालना : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे उपोषण मागे घेत आहे, पण आंतरवाली सराटीतील साखळी उपोषण यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. जरांग यांनी 2 दिवसांत आपली पुढील दिशा ठरवणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.
समाज बांधवांच्या मागणीनुसार 17 व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना अंतरवाली सराटीत येता येत नाही. त्यामुळे मी राज्यातील गावा-गावात जावून समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दुपारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. रात्री 5 हजार महिला, 25 हजार लोकं होती. रात्रीच त्यांना काही तरी घडवून आणायचे होते. पोलिस व मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी लाठीचार्ज घडला असता. असे झाले असते तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. पहिला हल्ला फडणवीस यांनी केला आहे. आताही त्यांचाच डाव आहे. जशास तसे उत्तर येत आहेत म्हणून आणखी केसेस मागे घेतल्या नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेवू नये. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. तुम्ही चक्रव्यूह रचले होते. तुमची इच्छा होती राज्यात दंगल घडण्याची. पण आम्ही तो डाव उधळून लावला आहे, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
दरम्यान आज मराठा आंदोलक मनोज जरांगे आंतरवालीत दाखल झाले आहेत. तिथे उपस्थित मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले असून आपण संध्याकाळी 5 वाजता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हंटले होते. तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.