छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शब्द सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. ते कायद्याच्या चौकटीत टिकेल याचीही हमी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, त्यानंतर आरक्षण न दिल्यास आमच्यासाठी विधानसभा निवडणुकीचे मैदान अटळ असेल. यावेळी चार ते पाच समुदायांना सोबत घेऊन सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा सुस्पष्ट इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून लागू करण्याच्या मागणीसाठी आरक्षण लागू व जरांगे-पाटील यांनी ८ जूनपासून अंतरवाली सराटी येथून चौथ्यांदा बेमुदत उपोषण सुरू केले होते. गुरुवारी राज्याचे मंत्री शंभु शंभुराज देसाई, खा. संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेऊन कायदेशीर कार्यवाहीसाठी एका महिन्याचा वेळ मागवून घेतला. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी उपोषण स्थगित केले. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, दरवेळी सरकारकडून आश्वासन दिले जाते. मात्र, यावेळी मंत्री देसाई यांनी कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक आहे, त्यासाठी किमान एका महिन्याचा वेळ हवा आहे, असे सांगितले