मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या वाल्मीक कराडने आवादा कंपनीकडून एकदा नव्हे तर 6 वेळा खंडणी मागितल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याचे तपास यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.
आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे की, वाल्मीक कराड व त्याच्या गुंडांचे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते. पैसे द्या, नाहीतर प्रकल्पाचे काम बंद करा, अशा धमक्या ते देत होते. वाल्मीक कराडकडून 28 ऑगस्ट 2024 रोजी आवादाच्या अधिकाऱ्यांना खंडणीचा पहिला फोन केला होता. परळीला येऊन भेटा नाही तर काम बंद करा. तुमची कामे कुठे सुरु आहेत, याची मला माहिती आहे. तुमचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना माझ्याकडे घेऊन या, असे वाल्मीक कराड फोनवरून अधिकाऱ्यांना सांगत होता.
प्लांट सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही काम सुरू करु देणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती. या घटनेनंतर माझे सहकारी शिवाजी थोपटे यांच्या मदतीने माझी परळीच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात वाल्मीक कराड, विष्णू चाटे याची भेट झाली, असे आवादा कंपनीचे अधिकारी शिंदे यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.
ते आपल्या जबाबात पुढे म्हणतात, वाल्मीक कराडने खंडणीसाठी पहिला फोन 28 ऑगस्ट तर दुसरा फोन 11 सप्टेंबर 2024 रोजी केला होता. त्यानंतर 8 ऑक्टोबर 2024 रोजी त्याने तिसरा फोन केला. त्यानंतर आम्ही वाल्मीक कराडची भेट घेतली. त्यानंतर सुदर्शन घुलेने 26 नोव्हेंबर 2024 रोजी चौथा कॉल केला. त्याने कंपनीत येवून वाल्मीक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, असे त्याने धमकावले.
त्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजता विष्णू चाटेने पाचवा फोन केला. वाल्मीक अण्णा बोलणार आहेत असे सांगत त्यांनी कराड यांच्याकडे फोन केला. तेव्हा वाल्मीक कराडने अरे ते काम बंद करा, चालू ठेवले तर वातावरण गढूळ होऊन बसेल. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे. त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा. काम चालू कराल तर याद राखा, असा दम वाल्मीक कराड यांनी भरला होता.
या घटनेनंतर 29 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुलेने खंडणीसाठी आधी फोन केला आणि नंतर थेट मस्साजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला. तेव्हा वाल्मीक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा. अण्णा आज केजमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घ्या, असे सांगून तो निघून गेला.
सुदर्शन घुले याने 6 डिसेंबर 2024 रोजी खंडणीसाठी शेवटचा कॉल केला. त्यानंतर तो कंपनीच्या कार्यालयात आला. यावेळी त्याने आमच्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. तो शिवाजी थोपटे यांना 2 कोटी द्या, नाहीतर कंपनी बंद करा असे वारंवार सांगत होता. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या संतोष देशमुखांनी कंपनी बंद करू नका असे सांगितले. त्यावर सुदर्शन घुले याने त्यांना तुला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असेही शिंदे यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.