मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात महिला व तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरणातून हल्ले, बलात्कार, लैंगिक अत्याचार असे अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील विरारमध्ये घडली आहे. प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने अनेक वार करत तिला गंभीर जखमी केले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न देखील ठरले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अक्षय जनार्दन पाटील असे या आरोपीचे नाव असून तो विररार पूर्वच्या गास कोपरी या गावात राहतो. त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्यासोबत मागील 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अक्षय आणि भाविका यांचे डिसेंबरमध्ये लग्न देखील ठरले आहे. सगळे छान सुरू असताना अक्षय भाविकावर संशय घेऊ लागला. भाविका दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलत असल्याचा अक्षयला राग आला, त्यानंतर अक्षयने थेट भाविकाच्या हत्येचा कट रचला.
विरार येथील रामभजन मेडिकल स्टोअरमध्ये भाविका फार्मसिस्ट म्हणून मागील चार महिन्यांपासून काम करत होती. 26 फेब्रुवारीला अक्षय तिच्याकडे आला. त्याने रागाच्या भरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरू केले. तसेच त्याच्याकडील धारदार शस्त्राने भाविकाच्या हातावर व मनगटावर वार केले. या मारहाणीत भाविकाचा जबडा फ्रॅक्चर झाला असून गंभीर जखमी झाली आहे. भाविकावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अक्षयला विरार पोलिसांनी अटक केली आहे .
दरम्यान, पुण्यात स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला असून यातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे अद्यापही फरार आहे. गुणाटी या गावात तो ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा या गावात तैनात करण्यात आला असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.