मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गट व पवार गटात शीतयुद्ध सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आभार मेळावा आयोजित केला जात आहे. आज हा मेळावा कोकणातील रत्नागिरीत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांचे आभार मानले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादामुळे मी तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या विजयामध्ये कोकणी माणसाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एकही आमदार निवडून येणार नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती महाराष्ट्राने बंद केली, अशा शब्दांत ठाकरे गटाला टोला लगावला.
आज रत्नागिरी येथे आयोजित आभार मेळाव्यात माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या कोकणवासियांनो मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला, आपले आभार मानायला आलो आहे. प्रचार सभांना आलो असता या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल, असे म्हणालो होतो. त्यामुळे मी आज आपले आभार मानायला आलो आहे. कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला आलो आहे. आज अनेक लोकांचे प्रवेश झाले. त्यांचेही मनापासून स्वागत करतो. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले. तुम्ही देखील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम केले आणि आशीर्वाद दिले. या शिवसेनेच्या विजयामध्ये कोकणी माणसाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. महायुतीने 15 जागा लढवल्या आणि 14 जागा जिंकल्या.
मी सभागृहात सांगितले होते, एकही आमदार पडू देणार नाही. देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. विधानसभेच्या निवडणुकीत 235 आमदार निवडून आणले. या विधानसभा निवडणुकीत आपण दैदिप्यमान विजय दिला. मला आज अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे. लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटापेक्षा आपण 2 लाख मते जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि 60 आमदार निवडून आणले. एकही आमदार निवडून येणार नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती महाराष्ट्राने बंद केली. आपल्याला 15 लाख मते जास्त मिळाली. मग आता सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवले आहे. यावर जनतेने शिक्कामोर्तब केले.