---Advertisement---

२१ कोटींचा ‘कुबेर’ ठरला पशुमेळ्याचा स्टार; मुर्रा जातीचा बैल चर्चेत !

By team
On: February 14, 2026 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भरलेल्या प्रसिद्ध पशु मेळ्यात ‘कुबेर’ नावाच्या मुर्रा जातीच्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहाबाद जिल्ह्यातील नागोडी गावातून आणलेला हा चार वर्षांचा बैल तब्बल २१ कोटी रुपयांच्या किंमतीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आकार, शरीरयष्टी आणि वंशपरंपरेमुळे कुबेरला मेळ्याचा निर्विवाद स्टार मानले जात आहे.

कुबेरचे मालक विकास यांनी सांगितले की, राजस्थानमधील Pushkar Fair मध्ये ‘जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडा बैल’ असा किताब मिळाल्यानंतर कुबेरची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्या मेळ्यानंतर त्याची किंमत २१ कोटी रुपयांवर पोहोचली. यापूर्वी त्याची किंमत ११ कोटी रुपये होती.

अलिकडेच आंध्र प्रदेशातील एका इच्छुक खरेदीदाराने एका इटालियन मध्यस्थामार्फत २१ कोटी रुपयांची औपचारिक बोली लावल्याची माहिती विकास यांनी दिली. मात्र, “कुबेर हा आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्याला विकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कुबेरचे वीर्य प्रति डोस ५०० रुपयांना विकले जाते. त्यातून दरमहा सुमारे २० लाख रुपयांची कमाई होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इटली, अमेरिका आणि इंग्लंडमधूनही चौकशी सुरू असल्याचे विकास यांनी सांगितले. कुबेर हा चॅम्पियन वंशातून आलेला असून त्याचा जन्म ‘अर्जुन’ या माजी विश्वविजेत्या बैलापासून झाला आहे. त्याची आई तिच्या शिखर काळात २३ लिटर दूध उत्पादनासाठी ओळखली जात होती, तर आजोबा ‘खली’ देखील विश्वविजेते होते. कुबेर सध्या ५.५ फूट उंच आणि सुमारे ८ फूट लांब असून त्याच्या वीर्यातून आतापर्यंत ३,००० हून अधिक वासरे जन्माला आल्याचा दावा आहे.

कुबेरच्या आरोग्यासाठी त्याला विशेष खाद्य, हरभरा, दररोज सात लिटर दूध आणि २५० ग्रॅम तूप दिले जाते. हिवाळ्यात गाजराचा रस दिला जातो. दररोज पाच किलोमीटर चालणे आणि दोन तास मालिश अशी त्याची नियमित दिनचर्या आहे. कुबेरच्या भव्य शरीरयष्टीमुळे आणि विक्रमी किंमतीमुळे पशुप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!