अक्कलकोटला वरदान ठरणारे कुरनूर धरण १०० टक्के भरले
२५० क्यूसेक पाणी खाली सोडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याला वरदानी ठरणारे कुरनूर धरण अखेर बुधवारी रात्री उशिरा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून अतिरिक्त पाणी खाली सोडण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी धरणाचा पाणीसाठा हा ८० टक्केच्या आसपास होता.उजनीच्या पाण्यावरती किमान पाच ते सहा दिवस अजून लागले असते, असा अंदाजही पाटबंधारे विभागाने वर्तवला होता.
परंतु मागच्या दोन दिवसात परतीच्या पावसाने तुळजापूर तालुक्यात मोठा दिलासा दिल्याने बोरी नदीच्या विसर्गात अचानक वाढ झाली आहे.त्यामुळे धरणात ४८ तासात १५ ते २० टक्के पाणी साठून धरण १०० टक्के भरले आहे. उजनीतून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा खूप कमी आहे. बोरी नदीच्या पाण्याने मात्र पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.आता उद्या (गुरुवारी) पाटबंधारे विभाग धरणाचे काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.धरणाची एकूण क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट असून या पाण्यामुळे अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तीन शहरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे याचा फायदा शेती क्षेत्राला सुद्धा होणार आहे.एक महिन्यापूर्वी तालुक्यात पावसाअभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी नेते मंडळींनी केली होती. त्यानुसार तात्काळ उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली. यामुळे नदीकाठच्या ५१ गावांना दिलासा मिळणार आहे.तहसीलदार विनायक मगर तसेच पाटबंधारे विभागाने बोरी नदीकाठच्या गावांसाठी स्वतंत्रपणे सतर्कतेचा आदेश जारी केला आहे. त्याशिवाय तलाठी, मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांच्या मार्फत
ही गावोगावी हा संदेश देण्यात आला आहे.
मागच्या दोन वर्षापासून बोरी नदी कोरडी पडली होती.आता धरणातून अतिरिक्त पाणी खाली सोडल्यास ही नदी दुथडी भरून वाहणार आहे.या क्षणाच्या प्रतीक्षेत धरणाच्या
खालचे शेतकरी दिसत आहेत.एकूणच काय तर कमी पाऊस असतानाही यावर्षी कुरनूर धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.