नाशिक : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहिण योजना सुरु केली होती हि योजना महायुती सरकारला गेमचेंजर ठरली होती आता लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये मिळावे अशी विरोधकांची जोरदार मागणी सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी टप्प्याटप्याने पूर्ण करणार आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करावे, असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केले.
दोन दिवसापूर्वीच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता महिला नेत्या निर्मला गावितांनी पक्षाला रामराम केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत आहे. गावित या इगतपुरी मतदारसंघातून दोन टर्म आमदार होत्या. 2019 मध्ये त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे सलग 9 वेळा लोकसभेचे खासदार झाले होते. दरम्यान, गावित यांचा जय महाराष्ट्र हा उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांच्यासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.