ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया – शरद पवार

८२ वा वाढदिवस साजरा,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 'शरद जनसेवा' अभियानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई दि. १२ डिसेंबर – आपण एकसंघ राहूया राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू आणि देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया त्यासाठी सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सर्वांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पवार यांचा ८२ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पवार यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

आज मला सन्मानित केलात याचा आनंद आहे. माझी वयाची ८२ वर्षे पूर्ण झाली आणि ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करुन देता अशी मिश्किल टिपण्णी भाषणाच्या सुरुवातीला आदरणीय शरद पवार यांनी करताच सभागृहात एकच हंशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कर्तृत्ववान नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा गाढा नीटनेटका चालवावा अशी अपेक्षा ठेवली तर चुकीचे नाही असे कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच अशा लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यात अधिक लक्ष घालून याची जाणीव करून देण्यासाठी हा सोहळा याठिकाणी आयोजित केला आहे.मी आणि माझ्या आसपासच्या वयाचे लोक नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याची भूमिका अखंडपणे केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास देतानाच आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत. त्यामध्ये भाजपचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. ती समाजहिताची नसतील तर त्याचपध्दतीची भूमिका घ्यायची असते. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा संबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोल शरद पवार यांनी सुनावले.

नागपूरचा कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात फार मोठ्याप्रमाणावर विरोधकांवर टिका केली. जाहीर सभेला पक्षाच्यावतीने गेले, निवडणूक प्रचाराला गेले आणि पक्षाची भूमिका मांडतात तो विरोधकांवर टिका टिपण्णी करण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. रेल्वे, रस्ते उद्घाटन, हॉस्पिटल उद्घाटन आणि सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान ज्यावेळी करतात त्या व्यासपीठावर विरोधकांवर टिकाटिपणी ही जर भूमिका मांडतात हे कितपत शहाणपणाचे आहे असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

मी अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले, भाषणे ऐकली आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून आणि त्यानंतरचे पंतप्रधान असोत निवडणूकीच्या प्रचाराला गेल्यानंतर विरोधी पक्षाची सरकारे असली तरी नेहरूंनी त्यांच्या विरोधकांवर कधी टिका केली नाही. आपली भूमिका मांडली पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष,यासुध्दा लोकशाहीच्या संस्था आहेत. त्या संस्थांचा सन्मान ठेवला पाहिजे. या सगळ्या भूमिका देशाच्या स्वातंत्र्यलढ्यानंतरच्या पंतप्रधानांनी पाळल्या परंतु आता पाळले जात नाही याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. समृद्धी रस्त्याला विरोधकांनी विरोध केला. मला माहिती नाही कुणी विरोध केला. माझा एक अनुभव सांगतो, मी औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. हा जो रस्ता होतोय त्यामध्ये जमीनी घेत आहेत. त्या जमीनीची रास्त किंमत देत नाही हे ऐकल्यानंतर मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि हा विकासाचा प्रकल्प आहेत तो होत असेल तर विरोध नाही परंतु ज्यांच्या जमीनी घेत आहात त्यांचे आयुष्य व उत्पन्नाचे साधन आहे त्यांना रास्त किंमत द्या आणि त्यांना सन्मानाने जगता येईल असे सुचवले होते मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधी विरोध केला नाही असे स्पष्ट करतानाच सत्ताधारी सांगून टाकत आहेत की आम्ही चांगलं काम करतोय पण विरोधकांचा विरोध आहे याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मध्यंतरी काही प्रकार झाले आणि जो काही प्रकार झाला ते योग्य नाही त्याचे मी समर्थन करणार नाही. विरोधकांवर टिका करायचा अधिकार आहे तसा सत्ताधाऱ्यांवर टिका केली पाहिजे परंतु टिका करणे म्हणजे अंगावर
शाईफेक करणे हा नव्हे. आम्ही याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु शाईफेक झाल्यावर त्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी बोलणे केले नसते तर असा प्रकार झाला नसता. त्यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर,यांचा उल्लेख केला. फुले आणि आंबेडकरांचे जीवन संपूर्ण देशाला माहित आहे.भाऊराव पाटील यांनी आपलं आयुष्य ज्ञानादानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीचे दागिने विकून शिकणार्‍या मुलांचे दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली याची आठवण करून देतानाच शरद पवार यांनी ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीद वाक्य असलेल्या रयतमध्ये मी अध्यक्ष आहे. गेली ५० वर्षे त्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारीवर आम्ही काम करतो. हे काम करत असताना आम्ही राजकीय पक्षाचे जोडे कधी घालत नाही. तिथे सामान्य कुटुंबातील मुलामुलींना दालन कसे खुले राहिल, त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल असा प्रयत्न असतो. अशा संस्थां किंवा महात्मा फुले, आंबेडकराबाबत बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर असे घडले नसते. ठीक आहे झाले ते झाले परंतु लगेच गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून दाखवले. मंत्रीमंडळात मंत्री होतात. अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? असा सवालही शरद पवार यांनी करताना कितीतरी लोक असे आहेत. त्यांच्यावर टिका टिपण्णी झाली परंतु त्यांनी हा कांगावा कधी केला नाही हे दुर्दैव आहे. हे कधी घडलं नसते तर चांगले झाले असते मी याचे समर्थन करत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्व मित्रांना मग ते कोणत्याही पक्षाचे असोत टिका होईल परंतु शाई टाकणे व तत्सम हे काम कधी करणार नाही ही भूमिका आपण घेऊ आणि महाराष्ट्राची जी एक सुसंस्कृत परंपरा आहे ती टिकवू आणि याची काळजी घेऊ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

• फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार आपल्या राष्ट्रवादीच्या डीएनएमध्ये आहे – जयंत पाटील

सध्या एका विचित्र कालखंडातून आपण सर्वजण जात आहोत. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात लोकप्रिय महाविकास आघाडी सरकार आले होते. महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे ते सरकार होते, फुले – शाहू – आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले. हाच विचार आपल्या राष्ट्रवादीच्या डीएनएमध्ये आहे असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोहींचा काळ सुरू आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम हाती घेतले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले महापुरुष आपले भूषण आहे, आपला गौरव आहेत मात्र त्यांच्याबाबत अपमान केला जात आहे. महापुरुषांना कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

राज्यपालांनी आज दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे. इतका वेळ लागला? जाण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पत्र लिहिताय ? तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जे काम केले आहे, महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यपालांना स्वीकारत नाही असे समोर आले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली त्याचे आम्ही समर्थन करत नाही मात्र त्या तरुणावर किती कलमे लावली ? इतका अन्याय ? मूळ मुद्दा बाजूला घालवण्यासाठी हे सर्व केले जात आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

काल समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले, विकासाला आमचा विरोध नसतो. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी या महामार्गासाठी भरघोस निधी दिला. महाविकास आघाडी सरकारचेही या महामार्गाच्या निर्मितीत योगदान आहे हेही आवर्जून जयंत पाटील यांनी सांगितले.

आपण वर्षभर १२ डिसेंबरची वाट बघत असतो. पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी उत्सवच आहे. साहेबांनी महाविकास आघाडीचे सरकार आणले जे शाहू- फुले – आंबेडकर यांच्या विचारांची कास धरणारे होते असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

• महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले – अजित पवार

महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या.

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांकडे पाहिले गेले आहे. पवारसाहेबांनी दूरदृष्टी ठेवत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वास्तू उभी करायची कल्पना आणली ती सत्यात उतरवली हेच त्यांच्या कामाचे गमक आहे असेही अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरीवर झाला. तिथले खासदार अमोल कोल्हे आहेत. रायरेश्वरवर शपथ घेतली तो किल्ला भोरमध्ये येतो तिथल्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला तो किल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मतदारसंघात आहे तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड स्थापन केली ती राजधानी खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघातच आहे आणि हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे आहेत हेही अजित पवार यांनी सांगितले.

आपापसातील मतभेद संपवा… दोन पावले मागे या.. पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल तर मागेपुढे हे घ्यावेच लागेल असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे मात्र त्यांच्या मनात पवारसाहेबांबद्दल असलेले स्थान लक्षात घेतले पाहिजे हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे पवारसाहेबांच्या विचाराचे लोक निवडून कसे येतील असा निश्चय करुया असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

आदरणीय शरद पवारसाहेबांनी देशातील राजकारणात समाजकारणात भूषवलेल्या विविध पदाची प्रतिमा उंचावल्याचे पहायला मिळाले आहे अशा शब्दात शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा खासदार सुनिल तटकरे यांनी गौरव केला.

कर्जमाफीचा निर्णय शरद पवारसाहेबांनी पहिल्यांदा घेतला. महिलांच्या सशक्तीकरणाला प्राधान्य पवारसाहेबांनी दिले. शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार घेऊन आपण काम करत आहात. हे सांगतानाच आज विषमतेचे राजकारण केले जात आहे. महापुरुषांचे अपमान केले जात आहेत याबाबत सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

आदरणीय शरद पवारसाहेबांनी सीमा प्रश्नावर कर्नाटक सरकारला ४८ तासाचा अल्टीमेट दिल्यानंतर कर्नाटक सरकारला जाग आली हेही आवर्जून सांगितले. दरम्यान खासदार सुनिल तटकरे यांनी पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

साहेबांचे कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की ते कशातही मोजता येण्यासारखे नाही असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

शाहू – फुले – आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निव्वळ आत्मसात केलेच नाही तर ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी केला आहे.
हा दीपस्तंभ आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहो अशा भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

पवारसाहेबांचा लोकसंग्रह हेच त्यांचे खरे शक्तीस्थान आहे अशा शब्दात खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, कला, क्रीडा यांचे विद्यापीठ हे शरद पवार आहेत असे उद्गार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

सत्ता सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी हवी आहे. मराठवाडा विद्यापीठाला नाव दिले, बॉम्बस्फोटानंतर मुंबई चोवीस तासात उभी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. खो- खो, कबड्डी खेळ देशात आणि देशाबाहेर नेण्याचे काम केले. सहकारी संस्था, साखर कारखाने उभारले याबद्दल छगन भुजबळ यांनी सविस्तर माहिती दिली.

मंत्रालयात महापुरुषांच्या प्रतिमा लावतो आणि त्याच मंत्रालयातील मंत्री महापुरुषांचे अपमान करत आहेत. त्यांना आवरा ना असे आवाहनही छगन भुजबळ यांनी यावेळी सरकारला केले.

पवारसाहेबांना लोकशाहीप्रदान करणारा समाज हवा आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांनी काम करणारे लोक निवडून दिले पाहिजे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शरद जनसेवा’ अभियानाची सुरुवात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली.

व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून कोल्हापूरहून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. साहेब व्यक्ती नाही तर ती संस्था आहे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

देवावर जास्त विश्वास ठेवतो त्या विचाराचा पक्ष देशात सत्तेत होता त्या पक्षाचे पंतप्रधानपद अटलबिहारी वाजपेयी होते त्यांनी गुजरातला झालेल्या भूकंपात या देवमाणसाला बोलावले होते याची आठवण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुन दिली.

शेतकऱ्यांवर अडचण आली त्या – त्या वेळी आदरणीय शरद पवारसाहेब धावून गेले आहेत राजकारणात, सामाजिक क्षेत्रातील हे व्यक्तिमत्त्व नाही तर हे विश्वातील चालते-बोलते विद्यापीठ आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

माझ्यासारख्या असंख्य तरुणांचे आयुष्य तुम्हाला मिळू दे अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बीड येथून बोलताना केली.

साहेबांसोबत राहणे म्हणजे आपल्याला समृध्द करणे असे सांगतानाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये साहेबांना बळ देण्याचे काम करुया असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादहून केले.

शरद पवार म्हणजे एक मोठे विद्यापीठ आहे. महाराष्ट्र तळहातावर माहित असलेला एकमेव नेता आहे अशा शब्दात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्याला माणसाची किती काळजी असते आणि महाराष्ट्राची असते. राजकारणापलीकडील मैत्री कशी असावी हे साहेबांकडून शिकावे. राज्यातील औद्योगिकीकरण याला एकमेव जबाबदार शरद पवारसाहेब आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती देऊन आदरणीय शरद पवारसाहेब यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, कॉंग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब पाटील,, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, शिवसेना आमदार मनिषा कायंदे, केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, तर व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील आणि राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व आभार प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!