मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची भाजपने गेल्या काही दिवसापूर्वी यादी जाहीर केल्यानंतर अनेक खासदारांची उमेदवारी रद्द करण्यात आली तर काहीना संधी दिली तर दुसरीकडे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील तर बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने तर कोल्हापूर मधून संजय मंडलीक यांना संधी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आठ पैकी सात विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिवराव लोखंडे यांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेला लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती जागा मिळणार, याबाबत अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. असे असताना एकनाथ शिंदे यांनी केवळ आठ उमेदवारांची नावांची घोषणा केली आहे. मात्र, इतर ठिकाणी खासदार नाराज नको, म्हणून या पहिल्या यादीत शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव टाळण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.