ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जायचे की नाही,याचे अधिकार स्थानिक नेत्यांना : इम्तियाज जलील !

प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास संजय शिरसाट थेट जेलमध्ये जातील : जलील

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात एमआयएम पक्ष कुणासोबतसुद्धा युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो,तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो,तेव्हा ते पराभवाचे खापर एमआयएम पक्षावर फोडत युतीसाठी हात पुढे करतात असे सांगत सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत जायचे की नाही याचा निर्णय स्थानिक नेते घेतील. एमआयएम मात्र महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. मागील काही वर्षापासून पक्षाची ताकद वाढली आहे, ती या निवडणुकीत दाखवून देऊ अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली.इम्तियाज जलील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष फारुक शाब्दी, निरीक्षक अन्वर सादात, शौकत पठाण, अजहर हुंडेकरी यावेळी उपस्थित होते.

 

..तर संजय शिरसाट जेलमध्ये जातील..

संभाजीनगरचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आपण पोलखोल केली आहे. याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे दाखल केले आहेत.त्याचा आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. खरंच प्रामाणिकपणे या भ्रष्टाचाराची चौकशी झाली तर मंत्री संजय शिरसाट जेलमध्ये जातील,असा इशारा यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही,अशा पद्धतीची केलेली भाषणे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणणार असल्याचेही जलील यावेळी बोलताना म्हणाले.=

 

उद्धव आणि राज एकत्र यावेत…..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे,असे सांगतानाच देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जातीय राजकारण करायचे, परंतु शिवसेनेचे सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सर्वांना घेऊन जातात, त्यांच्याकडून जातीय राजकारण होताना दिसत नसल्याचेही इम्तियाज यांनी सांगितले.

 

सोलापूर महापालिका जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखला व्हावा

एखादी घटना किती वाईट असू शकते हे सोलापूर औद्योगिक वासाहत येथील परिस्थिती बघितल्यावर दिसून येते. सोलापूर महापालिका याला जबाबदार आहे, अशा भागात सुविधा ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती. उलट कारखानदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. या भागात बरेच बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. मग आठवड्याला पॉकेट मिळते की महिन्याला असा आरोप सुद्धा त्यांनी केला. महापालिका फायर ब्रिगेड विभागसुद्धा तुटपुंजा आहे. क्रिमिनल मर्डर सारखी घटना असून याला महापालिका कर्मचारी जबाबदार असल्याचे दिसून येते.याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी जलील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!