ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी बोलविले एसटी महामंडळाच्या संघटनांना चर्चेसाठी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बससेवा ठप्प होती, त्यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात व्यग्र होते. शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. सणासुदीच्या दिवसांत संप करू नये, सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनांनी केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली आहे.

या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी एक पोस्ट करत सरकारला प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकार मध्ये कामे कोणाची होत आहे? महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यांनी आता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा. गणपती आणि ऐन सणासुदीच्या काळात एसटी चा संप सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींना आणि आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी आणि राज्यातील सामान्य प्रवाशी दोघांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीने हा संप सोडवावा ही आमची मागणी आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!