पुणे, वृत्तसंस्था
राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाल्याने हळूहळू थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात यंदाचे आतापर्यंतचे निच्चांकी तापमान नोंदविले गेले आहे. अशात आता राज्यावर अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाली आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. हे वारे राज्याच्या दशेने मार्गक्रम करीत आहे. त्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
पुण्यात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये बुधवारी १२.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा १३ ते १६ अंशांच्या दरम्यान राहिला. पुढील आठवडाभर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील आणखी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
येत्या २६ नोव्हेंबरनंतर थंडीतील सातत्य जैसे थे राहण्याचा अंदाज आहे. तरी त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे. या शक्यतेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा नऊ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे.
अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या नऊ जिल्ह्यांत चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळू शकतो.
राज्यातील तापमान
पुणे १२.२
जळगाव १३.२
कोल्हापूर १७.२
महाबळेश्वर १३.२
नाशिक १२.४
सांगली १५.८
सोलापूर १७.४
मुंबई २३.२
परभणी १३.६
नागपूर १३.६