सोलापूर : वृत्तसंस्था
कुडल येथील सीना-भीमा नदीच्या पवित्र संगमावर श्री संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला पूर्वेच्या दिशेला सात दरवाजे आहेत. या सात दरवाजातून महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेची पहिले सूर्यकिरण श्री संगमेश्वर देवाच्या मूर्तीवर पडणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे महापूजा आणि संगमेश्वर मूर्तीस अभिषेक केला जाणार आहे. सायंकाळी सहाच्या दरम्यान मंदिर परिसरातील दोन नद्यांच्या संगमावर काशिच्या धर्तीवर महाआरती व दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
येथील संगमाच्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावरील संगमेश्वराच्या मंदिराला पूर्वेच्या दिशेला हरिहरेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला मध्यम आकाराचे सात दरवाजे आहेत. या सातही दरवाजातून महाशिवरात्रीच्या दिवशी श्री संगमेश्वराच्या मूर्तीवर सकाळची पहिली सूर्यकिरणे पडतात.
वर्षभरात फक्त महाशिवरात्रीला मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. हे येथील विशेष आहे. तसेच, जगातील एकमेव बहुमुखी शिवलिंगास निरंतर अभिषेक करण्यात येणार आहे. या बहुमुखी लिंगास अभिषेक केलेल्या भाविकाला 365 दिवस अभिषेक केल्याचे पुण्य मिळते. तसेच, येथे हरिहरेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंग आणि अन्य देवदेवतांच्या मूर्तीही आहेत. या मूर्तींना अभिषेक केला जाणार आहे. तसेच, महापूजा करण्यात येणार आहे. अभिषेक आणि महाआरती हे पहाटेच्या वेळी होतो. मंदिर समिती आणि अन्य भाविकांच्या माध्यमातून आलेल्या भाविकांना दिवसभर महाप्रसाद म्हणून फराळाची सोय करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी काशि विश्वेश्वराच्या गंगा घाटावर ज्या पद्धतीने महाआरती होते. त्याच धरतीवर भाविकांच्या उपस्थित येथील नद्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सीना-भीमा नदीच्या संगमावरील घाटावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच लक्ष दीपोत्सवही आयोजित करण्यात आला आहे. येथील महाआरती आणि लक्ष दीपोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. या दीपोत्सवाला कुडलसह टाकळी, बरूर, कुरघोट, मंगळवेढा, इंडी, जमखंडी यासह अन्य गावांसह सोलापूर, विजापूर, अक्कलकोट येथील भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. बुधवारच्या सायंकाळपासून ते गुरुवारच्या पहाटेपर्यंत कुडलच्या परिसरातील अन्य गावांतील ग्रामदैवतांची पाचवेळा आरतीसह महापूजा होते.