मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना आता लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. जागावाटपा-संदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मविआतील कोणता पक्ष किती जागा लढवणार यासह मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांना, तर राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राजू शेट्टींना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले नाही. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्यामुळे आज होणाऱ्या महाराष्ट्रातील बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मविआच्या बैठकील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असतील. यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झाले नाही. शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. त्याशिवाय काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत बैठकात तोडगा निघालेला नाही. त्यात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्या कोट्यातील दोन जागा प्रकाश आंबेडकर यांना दिल्या जातील, तर शरद पवार गटाकडून एक जागा राजू शेट्टी यांना देण्याचा विचार सुरु आहे.