ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फसव्या योजनांची घोषणा करून महायुतीला सत्तेत यायचे ; विरोधीपक्ष नेत्यांचा घणाघात !

नाशिक : वृत्तसंस्था

केंद्रातील अन् राज्यातील महायुतीचे सरकार फक्त धनधांडग्यांचे सरकार आहे. शेतकरी, गोरगरीब, मजूर यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही. निवडणुकांच्या तोंडाशी फसव्या योजनांची घोषणा करायची अन् सत्तेत यायचं हाच यांचा धंदा आहे. सत्ताधाऱ्यांचा हा डाव आता शेतकरी, नागरिक ओळखून आहे. राज्य सरकार अनिल अंबानींचे कर्ज माफ करते. मग आमच्या शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करीत नाही. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय का घेत नाही. सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कायमच कुचेष्टा केली जात असल्याचा आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

येथील रेणुका लॉन्सवर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, अनिल आहेर, प्रांतिक सदस्या हेमलता पाटील, उबाठाचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, मीनाताई कोतवाल, संजय जाधव, युवक काँग्रेसचे गौरव पानगव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिक जिल्हयातील शेतकरी सर्वाधिक कांदा, द्राक्ष पिकांचे उत्पादन घेतो. या पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे घर संसार चालतो. दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी शेती पिकवितो. मात्र शेतकऱ्यांच्या हाताशी शेतीमाल आला कि निर्यात बंदी करायची किंवा बाहेरून माल आयात करायचा हाच कित्ता भाजप सरकारने देशभरात चालवला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

केंद्र व राज्यातील सरकारला शेतकऱ्यांप्रती कोणतीही आस्था नाही आहे. यामुळे सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहे. निवडणुका आल्या की धर्माच्या नावाखाली राजकारण करायचे अन् स्वार्थ साधायचा हा डाव भाजपाचा असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली. ते पुढे म्हणाले, भूलथापाना बळी न पडता शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव देणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी विसरून सरकार फक्त योजनांचा पाऊस पाडीत गाजर दाखवीत असल्याचा घणाघात थोरातांनी केला. यावेळी श्रीराम शेटे, नितीन आहेर, संजय जाधव, विलास भवर, डॉ. राजेंद्र दवंडे आदींची भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!