महेश माने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; वाढदिवशी तरूणाने स्मशानभुमीत बसवले स्ट्रेटलाईट
अक्कलकोट, दि.१९ : सध्याच्या युगात वाढदिवसाचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालला आहे.केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी अन् पार्ट्या रंगवून वाढदिवसाचा जल्लोष केला जातोय. परंतु दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश माने यांनी या सर्व अनावश्यक बाबींना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या वाढदिवशी गावच्या स्मशानात स्वखर्चाने हायमास्ट दिवे लावून गावकऱ्यांसाठी मोलाचे योगदान दिले आहे. अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे उपाध्यक्ष माने यांच्या वाढदिनी विविध उपक्रम राबविण्यात आले. व्यासपीठावर म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, ष.ब्र.मृगेंद्र स्वामी, बसवलिंग महास्वामी(ताडमुगळी), गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, चुंगीचे सरपंच राजु चव्हाण, मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, संजय बाणेगांव, सचिन गजधाने, लखन झांपले, नितीन पाटील, विशाल गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बसवलिंग महास्वामी म्हणाले की, भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो.प्रत्येक तरूणाने महेश मानेंच्या विधायक कार्याचा आदर्श घेतल्यास देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वेळ लागणार नसल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त शिवाजीराव (अण्णा) पाटील सर ,लक्ष्मण राजेगावकर, दिगंबर राजेगावकर, विजय शहाणे, महादेव म्हेत्रे, राजेंद्र बोधले, अनसर शेख, फुलचंद चव्हाण, भाऊराव कांबळे यांचा तर आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान-अरुण पोपसभट, विजयकुमार जोजन, रमेश स्वामी, दत्ता गजाकोश आदर्श पोलीस कर्मचारी- महिबुब नदाफ, भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असलेले अमोल माने व सिद्धाराम कोळशेट्टी यांचा सन्मान तसेच सर्व अंगणवाडीसेविका मदतनीस व आशा वर्कर्स यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना माने म्हणाले, गावातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, सैन्यदलातील जवान, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर हे आपल्यासाठी खूप महत्वाचे घटक आहेत. त्यांचा सन्मान करणे ही खरी समाज सेवा आहे, ती यानिमित्ताने आपण जोपासली आहे. याव्यतिरिक्त माने यांच्या मित्र परिवाराकडून मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात १०१ जणांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यास संरक्षक जाळी बसवण्यात आली. तसेच गावातील मोक्याच्या ठिकाणी बाकडे बसवण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश स्वामी यांनी तर आभार धनराज व्हट्टे
यांनी मानले.
ग्रामविकासासाठी
ही संकल्पना मोलाची
महेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त
गावातील स्मशानात हायमास्ट दिवा लावण्यात आला.समाजसेवकांचा सन्मान झाला.प्रत्येक खेड्यातील तरूणांनी जबाबदारी ओळखुन समाजाची सेवा केल्यास निश्चीतपणे ग्रामीण भागात क्रांती होईल.
दत्ता शिंदे,चेअरमन,गोकुळ शुगर