अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री मल्लिकार्जुन महाराज की जयचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेचा रथोत्सव मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला.अपार उत्साह आणि नंदीध्वजांची नयनरम्य मिरवणुक याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.प्रारंभी श्री मल्लिकार्जुन महाराज की जय च्या जयघोषात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
सायंकाळी आठच्या सुमारास झालेल्या रथोत्सव कार्यक्रमाला महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.यात्रेनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक विधी आणि नंदिध्वजाची मिरवणूक सुरू होती. सायंकाळी बसस्थानक ते मल्लिकार्जुन मंदिर या मार्गावर हा रथोत्सव सोहळा पार पडला.पाच दिवसांपासून सुरू झालेल्या यात्रेत दररोज पूजा,विशेष आरती आणि अभिषेक असे विधी मंदिरात संपन्न झाले.रथोत्सव पूर्वी सायंकाळी नंदी ध्वजाचे विधिवत पूजन करून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.ज्यावेळी सायंकाळी नंदीध्वजाची मिरवणूक निघाली त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर मंदिराजवळ सायंकाळी रथापासून मंदिरापर्यंत सर्व नंदीध्वजाची परिक्रमा काढण्यात आली.तसेच शेवटी बसवेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली.त्यानंतर सर्व मानकरी,सेवेकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथ ओढण्यात आला.यावेळी शिवलिंग स्वामी,स्वामीनाथ हिप्परगी,महेश हिंडोळे,राजशेखर हिप्परगी,बसवराज माशाळे,बसलिंगप्पा खेडगी,राजशेखर नागुरे,शिवकुमार कापसे ,सुनील गोरे,प्रशांत लोकापुरे,विक्रांत गोरे,विजयकुमार लिंबीतोटे,प्रकाश उन्नद,नीलकंठ कापसे, विलास कोरे,गजानन पाटील, दिनेश पटेल आदींसह मल्लिकार्जुन भक्तांनी हजेरी लावलीे.या यात्रेदरम्यान रोडगे,लिंबीतोटे,नंदीकोले, पाटील,अडवितोटे परिवाराने नंदी ध्वज सेवा केली.
या रथोत्सव दरम्यान पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.नियोजनामध्ये नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.पोलीस प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेतली होती. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या र्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता.
नयनरम्य रथोत्सव सोहळा
डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा होता.यावेळी मोठ्या प्रमाणात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.या सोहळ्याला महायुतीचे उमेदवार राम सातपुते,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,म. नि. प्र बसवलिंग महास्वामी,महेश इंगळे,अमोलराजे भोसले,अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील,मिलन कल्याणशेट्टी,आनंद तानवडे,बसलिंगप्पा खेडगी,मल्लिनाथ साखरे,अविनाश मडीखांबे आदींनी उपस्थिती लावली.