जालना वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी भूमिका मांडली आहे. मराठे 6 कोटी आहेत. पण तरीही केवळ पाच-दहा आमदार निवडून आले असते तर समाजाने खाली मान घालून जाणं मला सहन झालं नसतं. आम्ही निर्णय काय एवढा वाईट घेतलाय? निवडणूक लढवायची नाही. संपला विषय. आमचा काही राजकारण हा खान्दानी धंदा नाही. आम्ही राजकारणासाठी आलो का? मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. हाच आमचा मूळ उद्देश आहे. मी काहींना काही दिशा सांगणार आहे. माझ्या समाजाचं योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावं. मी इमानदार रक्त आहे, बेईमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही.
जो बॉन्ड देईल, व्हिडीओग्राफी देईल त्यावर सुद्धा काही अपक्षांनी फॉर्म ठेवलेले आहेत. ते मला आज कळायला लागलं आहे. काहींनी त्या जीवावर फॉर्म ठेवले आहेत. आता मराठा समाजाला सांगतो कुणाचेही बॉन्ड मी घेणार नाही आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. कारण जे निवडून येणार नाहीत ते सुद्धा बॉन्ड द्यायला लागले आहेत. मराठा समाजाला काय करायचं आहे? आपल्याला आपली ताकद वाया जाऊ द्यायची नाही. कारण निवडून येण्याचं गणित आहे, त्या आधारावर मराठा समाजाची मते देवून त्याला निवडून आणायचं आहे. कुणीही लिहून दिलं आणि तो पराभवातच जमा असेल तर आपलाच उमेदवार उभा करायला आपल्याला अडचण काय होता?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा समाजाच्या अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यांनी एका शब्दांत अर्ज मागे घेतले. याचाच अर्थ त्यांनी समाजाचा विश्वासघात केला नाही. काहींनी अर्ज मागे घेतले नाहीत. काही जण मी बॉन्ड दिला असल्याचं सांगतो. पण आपण कुणालाही बॉन्ड दिलेला नाही. जिंकून येणाऱ्या उमेदवाराकडूनच बॉन्ड घ्यायचे. मराठ्यांचे मतदान खाण्यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी जातीसोबत असा डाव खेळायला नको होता. तसं करायचं असतं तर आम्ही आमच्या लोकांना अर्ज काढायला लावले नसते. कुणी बॉन्डबाबत बोलत असेल तर विश्वास ठेवू नका. मला मराठा समाजाला संकटात टाकायचं नाही. दहा-वीस लोकं राजकारणात जायचं बोलत होते. मला राजकारणाचा नाद असता तर 50 उमेदवार उभे केले असते. माझी ताकद दिली असती. माझा राज्यात दबदबा झाला असता. माझा स्ट्राईक रेट तो नाही. माझा स्ट्राईक मराठा समाज आहे. मला राजकारणाचा नाद नाही, मला गरिबाला सांभाळायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.