पुणे : वृत्तसंस्था
दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांचा मोसम जवळ आल्याने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या बाजारभावाची आशा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा आणि झेंडूच्या फुलांचं घट्ट नातं भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेलं आहे. राज्यातील झेंडू उत्पादन होत असते. जी गेल्यावर्षीच्या १३९.२ हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक आहे.
झेंडूच्या फुलांना नवरात्र, दसरा, दिवाळी व खंडेनवमीच्या काळात प्रचंड मागणी असते. मागील वर्षी झेंडूला प्रतिकिलो १०० ते १२० रुपये इतका भाव मिळाला होता. यावर्षी उत्पादन वाढले असले तरीही मागणीही तेवढ्याच प्रमाणात वाढल्याने भाव चांगलेच मिळतील, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये आहे. जेजुरीतील प्रसिद्ध खंडेनवमी उत्सव आणि मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची विक्री अधिक प्रमाणात होते. जेजुरी औद्योगिक वसाहत, पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग, निरा ते जेजुरी, झेंडेवाडी मार्गावर शेतकरी थेट विक्रीसाठी दुकाने थाटत असतात.
भाविकही जेजुरीला जाताना आवर्जून झेंडूची फुलं खरेदी करतात, त्यामुळे या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात सर्रास मागणी असते. सणासुदीचा हंगाम, वाढलेलं लागवड क्षेत्र, चांगलं उत्पादन आणि परंपरेचा सण यामुळे यंदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘सोन्याचे दिवस’ येतील, अशी आशा आहे.