आमदार कल्याणशेट्टींची क्रेझ अन म्हेत्रेंचे गूढ मौन ! आगामी राजकारणाबद्दल मोठी उत्सुकता
आगामी राजकारणाबद्दल मोठी उत्सुकता
अक्कलकोट : मारुती बावडे
एकीकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून विकास कामांचा धडाका आणि दुसरीकडे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे ‘मौन’ कार्यकर्त्यांना खूप काही सांगून जाणारे आहे.युवा नेतृत्वा विरुद्ध ज्येष्ठ नेतृत्व अशी लढाई तर होणारच आहे पण आगामी निवडणुकांसाठी ती आरपारची लढाई असेल हे मात्र नक्की आहे.म्हेत्रे यांच्या मौन भूमिकेमुळे नेमकं त्यांच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडू लागला आहे.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे एक काँग्रेसमधले जिल्ह्यातले अनुभवी नेतृत्व.अनेक वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत. बेरजेच्या राजकारणात अतिशय चाणाक्ष.तालुक्यातल्या गावातील खडा न खडा माहिती त्यांना आजही रोजच्या रोज मिळते.गावात सुई पडली तरी त्यांना आवाज येतो,असे कार्यकर्त्यांचे त्यांच्याबद्दलचे परखड मत आहे.दीर्घ काळाच्या राजकारणामुळे त्यांना ग्रामीण भागात मानणारा वर्ग मोठा आहे.आज राजकीय परिस्थिती बदललेली आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे.वातावरण सध्या भाजपमय आहे.अनेक काँग्रेसचे दिगग्ज नेते पक्ष सोडून जात आहेत हे जरी वास्तव असले तरी ते कधीही गप्प नसतात हा मागचा इतिहास आहे.पण सध्याच्या
घडीला ज्या पद्धतीने त्यांनी राजकारणामध्ये संयम आणि मौन भूमिका घेतलेली आहे.
त्या मागचे नेमकं गूढ काय असा प्रश्न विरोधी पक्षासह कार्यकर्त्यांनी देखील पडण्यासारखी स्थिती आहे.कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आजच्या घडीला काँग्रेसमध्ये म्हेत्रे हे एकमेव तगडे उमेदवार आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट आहे.राज्यातील अवस्था तर न विचारलेलीच बरी.असे असताना म्हेत्रे यांनी ही घेतलेली भूमिका कार्यकर्त्यांना ‘विचार’ करायला लावणारी ठरत आहे. ही मोठ्या लढाई पूर्वीची तयारी तर
नसेल ना अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.दुसरीकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र मतदारसंघ विविध कार्यक्रमाने पिंजून काढला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अतिशय विश्वासू आमदार म्हणून त्यांची झालेली ओळख त्यांची राजकारणातील क्रेझ वाढवत आहे.
त्यात भाजपची जिल्हयाची सूत्रे त्यांच्याकडे आहेत.आज घडीला पक्षांतर्गत विरोधकांना देखील त्यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती सध्याची राजकिय स्थिती आहे.मतदारसंघातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी ते आणत आहेत.चारच दिवसांपूर्वी बहुचर्चित प्रलंबित अशा देगाव एक्सप्रेस योजनेसाठी चारशे कोटी रुपयांचे निधी मंजूर करून घेतला. तालुक्यातील प्रत्येक गाव -वाड्यावस्त्यावरील रस्त्यासाठी रोज लाखो रुपयांचा निधी ते आणत आहेत.मतदार संघाच्या विकासासाठी त्यांना मिळालेली ही सुवर्णसंधी समजून त्यांची वाटचाल सुरू आहे.
जेवढे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेता येईल तेवढे घेऊन विरोधी पक्ष खीळ खीळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.अजूनही आचारसंहितेच्या पूर्वी अनेक विकास कामांना मंजुरी मिळेल आणि तालुक्याचा चौफेर विकास होईल,अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे.आमदार कल्याणशेट्टी जे शब्द टाकतात ते काम होते,हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झालेले आहेत.जनता दरबारच्या माध्यमातून दर आठवड्याला लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.या माध्यमातून त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.या दोन्ही पक्षांमध्ये सध्या ही स्थिती असली तरी मित्रपक्ष मात्र गडबडले आहेत.मित्रपक्ष आता कोणाच्या बाजूने हा प्रश्न विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण वरच्या पातळीवर युत्या असल्या तरी आतमध्ये वेगळी खदखद त्यांच्या मनामध्ये आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ते कोणती भूमिका घेतात. यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत.अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर आत्तापर्यंत अनेक गोष्टी ह्या अनपेक्षित घडत आलेल्या आहेत.त्याचा विचार करता राजकारणामध्ये कोणत्याही गोष्टी गृहीत धरून चालत नाही ती ती परिस्थिती त्या त्या वेळेसचे राजकारण ठरवते आणि आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये गणित कसे असणार याचे आडाखे राजकीय जाणकार बांधू लागले आहेत.सध्याची राजकीय स्थिती शांततेची दिसत असली तरी भविष्य काळात ती अटीतटीची होणार हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची मात्र गरज नाही.