ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मंत्री आदिती तटकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त फटका बसला आहे. अनेक लोक बेघर झाल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचदरम्यान आता महिलांसाठी काही उपयोगाच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरेंनी याबाबतची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी पुरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी पालकत्र्यांना विनंती देखील केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यांतील बहुतांश भाग अतिवृष्टीने बाधित आहे. या संकटकाळात महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे आहे’, असे आदिती तटकरे यांनी ट्वीटमध्ये सांगितले.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘ही बाब विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या ३% महिला व बालकल्याण निधीतून पूरग्रस्त भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांच्या आरोग्यासाठी या विनंतीचा सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर कार्यवाही होईल हा मला विश्वास आहे,’ असे आदिती तटकरे यांनी ट्वीट करत सांगितले.

दरम्यान, पूरग्रस्तांना स्थानिक पातळीवर मदत करताना त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यासोबत कपडे आणि महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिनसारख्या वस्तू देखील गरजेच्या आहेत. त्यामुळे आता महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिलांपर्यंत त्यांच्या उपयोगाच्या वस्तू पोहचणार असून त्यांची गैरसोय टळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!