वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी वर्ध्यात आज ओबीसी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्यात छगन भुजबळ यांची गैरहजरी पाहायला मिळत आहे. भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सभेला गर्दीच झाली नसल्याने भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ मार्गदर्शन करणार होते. तसेच मेळाव्यासाठी सकाळी 11 वाजता वेळ देण्यात आली होती. मात्र उन्हामुळे उपस्थिती फारच कमी असल्याचे दिसले. सभास्थळावरील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. आलेले नागरिकही सावलीचा आधार घेऊन उभे होते. या मेळाव्याला जवळपास 25 हजार लोक उपस्थित राहतील, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात 400 ते 500 लोकंच सभास्थळी दाखल झाले होते.
प्रकृती ठीक नसल्याने भुजबळ यांनी वर्धा येथील सभेत जाण्याचे टाळले असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे याच वर्ध्याच्या सभेत अपेक्षित गर्दीच झाली नसल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी 25 हजार ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला होता. त्यानुसार तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी 500 च्या आतच लोकं हजर असल्याचे दिसून आले. तर, या ओबीसी मेळाव्यात गर्दी नसल्यानेच भुजबळ सभेला आले नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.